Friday, July 31, 2009

मोगरा

अलवारशा गुलाबी धुक्याला, सजवून गेला मोगरा हा
अन चेतल्या पहाटेस कैसा, विझवून गेला मोगरा हा

इतुक्यात जाग यावी पहाटे, इतुक्यात का हे भान जावे
गंधात दंगल्या पाकळ्यांना, उजवून गेला मोगरा हा

ओलावल्या दवांचे बहाणे, स्पर्शात वेडे जागण्याचे
स्पर्शात या बरसल्या दवांना, भिजवून गेला मोगरा हा

लाजेत रंग ओले ढळाले, अन पैंजणांना सूर आले
उबदारशा कसा या मिठीला, थिजवून गेला मोगरा हा

हुंदका..

हुंदका साधा तुझा सांगून गेला
सावरी जो तो सुद्धा पांगून गेला

तू पुन्हा ही राहिला प्यासाच येथे
जो नको तो आजही झिंगून गेला

हा वसंत असा कसा मोहरुन आला?
फ़ुलतसे जो...आज तो खंगून गेला

ज्यास सांगितले गुज सारे मनीचे
तोच फ़ासावर तुला टांगून गेला

काय तो आता पुन्हा सोडुन गेला?
तू पुन्हा एकटा अता दंगून गेला


सोडले दुनियेस सार्‍या आज का तू?
का शब्दात तुझ्या असा रंगून गेला?

ओठ ना जे बोलले दु:ख मनीचे
ते तुझ्या गझलेत तू सांगून गेला

गैर येथे

हुंदक्याला टाळणेही गैर येथे
आसवांना ढाळणेही गैर येथे

फूल नाही मी कुणीही हुंगलेले
तू मला का माळणेही गैर येथे?

आठवांशी का अताशा वैर झाले
आठवांना चाळणेही गैर येथे

काठ ह्या नदिचा मला हा का मिळाला?
सोवळ्याला पाळणेही गैर येथे

पान मी एक त्रासलेले...संपलेले
संपताना वाळणेही गैर येथे

चार खांदे शोधताना हार झाली
का मला 'मी' जाळणेही गैर येथे?

हाक

आसवांच्या पावसाला हाक देतो
आठवांच्या पाखराला हाक देतो

गायली तू माझिया गझलेस जेथे
मी पुन्हा त्या मैफलीला हाक देतो

काय होते सांग नाते आपले ते?
कोण माझे मी कुणाला हाक देतो?

गाव माझा दूर ना, मी दूर आहे
थांबलेल्या पावलाला हाक देतो

रात होता, गर्द मी काळोख होतो
एकटा मी हुंदक्याला हाक देतो

वाटते की आवरावा हा पसारा
संपताना संपण्याला हाक देतो?

व्यास

कोण आले? हा कुणाचा भास आहे?
सांजवेळी ही कुणाची आस आहे?

मी भिकारी माझियाही आसवांचा
कोरडी ही पापण्यांची प्यास आहे

पारध्याला मी उगा का दोष देऊ?
हा गळ्याला नेहमीचा फ़ास आहे

बैसलो मी मैफ़लीला या तुझ्यारे
सांग साकी काय आता खास आहे?

मावळावे का तुझ्या ही आठवांनी
वाटते हा शेवटाचा श्वास आहे

ढाळसी का आसवांना या तुझ्या तू
ओंजळीत तुझ्या अता मधुमास आहे

माझिया का या शब्दांना भाव यावा?
मी कुठे बोललो ’मी व्यास आहे’ ?

सावल्या

शब्द त्यांचे पाळती ना सावल्या या
चालता मी जाळती मज सावल्या या

वादळांना मी सहारा देत आलो
रात होता का पळाल्या सावल्या या ?

तू अशी का सांग झाली पाठमोरी
थांब थोडी शोधतो मी सावल्या या

का वसंती या उन्हांना जोर आला ?
पेटलेल्या पावसाळी सावल्या या

मी वदंता ही कुणाला ऐकवावी ?
आसर्‍याला आज आल्या सावल्या या

वाटा

पाहुनी मज का अताशा वळतात वाटा ?
ओळखीचा मी जरी का छळतात वाटा ?

मृगजळाचा मी शिकारी हे जाणतो मी
वास्तवाला पाहुनी या पळतात वाटा

सावल्याही पेटल्या का या पावसाळी ?
वाळवंटी दूर कोठे जळतात वाटा

पापण्यांनी पाझरावे का ऐनवेळी ?
आठवांना का तुझ्या गं कळतात वाटा ?

छेडता मी जोगियाला तू आठवावे
मैफ़लींना का तुझ्या ह्या मिळतात वाटा ?

चालण्याला मी अताशा सुरवात केली
मी क्षितीजा गाठले की खळतात वाटा