Friday, July 31, 2009

मोगरा

अलवारशा गुलाबी धुक्याला, सजवून गेला मोगरा हा
अन चेतल्या पहाटेस कैसा, विझवून गेला मोगरा हा

इतुक्यात जाग यावी पहाटे, इतुक्यात का हे भान जावे
गंधात दंगल्या पाकळ्यांना, उजवून गेला मोगरा हा

ओलावल्या दवांचे बहाणे, स्पर्शात वेडे जागण्याचे
स्पर्शात या बरसल्या दवांना, भिजवून गेला मोगरा हा

लाजेत रंग ओले ढळाले, अन पैंजणांना सूर आले
उबदारशा कसा या मिठीला, थिजवून गेला मोगरा हा

हुंदका..

हुंदका साधा तुझा सांगून गेला
सावरी जो तो सुद्धा पांगून गेला

तू पुन्हा ही राहिला प्यासाच येथे
जो नको तो आजही झिंगून गेला

हा वसंत असा कसा मोहरुन आला?
फ़ुलतसे जो...आज तो खंगून गेला

ज्यास सांगितले गुज सारे मनीचे
तोच फ़ासावर तुला टांगून गेला

काय तो आता पुन्हा सोडुन गेला?
तू पुन्हा एकटा अता दंगून गेला


सोडले दुनियेस सार्‍या आज का तू?
का शब्दात तुझ्या असा रंगून गेला?

ओठ ना जे बोलले दु:ख मनीचे
ते तुझ्या गझलेत तू सांगून गेला

गैर येथे

हुंदक्याला टाळणेही गैर येथे
आसवांना ढाळणेही गैर येथे

फूल नाही मी कुणीही हुंगलेले
तू मला का माळणेही गैर येथे?

आठवांशी का अताशा वैर झाले
आठवांना चाळणेही गैर येथे

काठ ह्या नदिचा मला हा का मिळाला?
सोवळ्याला पाळणेही गैर येथे

पान मी एक त्रासलेले...संपलेले
संपताना वाळणेही गैर येथे

चार खांदे शोधताना हार झाली
का मला 'मी' जाळणेही गैर येथे?

हाक

आसवांच्या पावसाला हाक देतो
आठवांच्या पाखराला हाक देतो

गायली तू माझिया गझलेस जेथे
मी पुन्हा त्या मैफलीला हाक देतो

काय होते सांग नाते आपले ते?
कोण माझे मी कुणाला हाक देतो?

गाव माझा दूर ना, मी दूर आहे
थांबलेल्या पावलाला हाक देतो

रात होता, गर्द मी काळोख होतो
एकटा मी हुंदक्याला हाक देतो

वाटते की आवरावा हा पसारा
संपताना संपण्याला हाक देतो?

व्यास

कोण आले? हा कुणाचा भास आहे?
सांजवेळी ही कुणाची आस आहे?

मी भिकारी माझियाही आसवांचा
कोरडी ही पापण्यांची प्यास आहे

पारध्याला मी उगा का दोष देऊ?
हा गळ्याला नेहमीचा फ़ास आहे

बैसलो मी मैफ़लीला या तुझ्यारे
सांग साकी काय आता खास आहे?

मावळावे का तुझ्या ही आठवांनी
वाटते हा शेवटाचा श्वास आहे

ढाळसी का आसवांना या तुझ्या तू
ओंजळीत तुझ्या अता मधुमास आहे

माझिया का या शब्दांना भाव यावा?
मी कुठे बोललो ’मी व्यास आहे’ ?

सावल्या

शब्द त्यांचे पाळती ना सावल्या या
चालता मी जाळती मज सावल्या या

वादळांना मी सहारा देत आलो
रात होता का पळाल्या सावल्या या ?

तू अशी का सांग झाली पाठमोरी
थांब थोडी शोधतो मी सावल्या या

का वसंती या उन्हांना जोर आला ?
पेटलेल्या पावसाळी सावल्या या

मी वदंता ही कुणाला ऐकवावी ?
आसर्‍याला आज आल्या सावल्या या

वाटा

पाहुनी मज का अताशा वळतात वाटा ?
ओळखीचा मी जरी का छळतात वाटा ?

मृगजळाचा मी शिकारी हे जाणतो मी
वास्तवाला पाहुनी या पळतात वाटा

सावल्याही पेटल्या का या पावसाळी ?
वाळवंटी दूर कोठे जळतात वाटा

पापण्यांनी पाझरावे का ऐनवेळी ?
आठवांना का तुझ्या गं कळतात वाटा ?

छेडता मी जोगियाला तू आठवावे
मैफ़लींना का तुझ्या ह्या मिळतात वाटा ?

चालण्याला मी अताशा सुरवात केली
मी क्षितीजा गाठले की खळतात वाटा

मुखवटे

ओढू किती मुखवटे?
शोधू कुठे मुखवटे?

का चेहरे हरवले?
उरले असे मुखवटे

खोटेच भाव सारे
येथे खरे मुखवटे

बघ पापणी ढळाली
का काढले मुखवटे?

जगणे खरे न येथे
येथे बरे मुखवटे

बाजार आज भरला
विकती इथे मुखवटे

--शब्द्सखा!

साकी

सांज झाली साकी अताशा अताशा
प्यास आली साकी अताशा अताशा

आसवे माझी कोरडी ही कशी गं?
रात न्हाली साकी अताशा अताशा

वेदना अजुनी ह्या कशा जागताहे?
जाम खाली साकी अताशा अताशा

वाटते न्यावे दूर मज तू जरासे
चाल चाली साकी अताशा अताशा

विसर तू ही दु:खे तुझ्या जी उराशी
हास गाली साकी अताशा अताशा

काय उरले सोडून या मैफलींना ?
कोण वाली साकी अताशा अताशा?

----शब्दसखा!

शान

येतसे क्षण जातसे क्षण भान नाही
’त्या’ हिशेबी वाटते हे पान नाही

शब्द माझे गं हे तुझे दास झाले
ओठ तू अन मी तुझे का गान नाही

का तुला मी अन मला तू आठवावे?
जिंदगी हे आठवांचे रान नाही

सोडतो मी सुरांच्या या मैफ़लींना
गायिले मी उमजणारे कान नाही

मी उगा का ही दयेची भीक मागू?
भास्कराला सावल्यांचे दान नाही

वादळांना कापताना श्वास सरला
हा किनारा गलबताचे स्थान नाही

पेटती त्यांच्या मशाली का दुपारी?
’दीप’ जो तिमिरात त्याला शान नाही

--शब्द्सखा!

हुंदके

ऐन राती कापले का हुंदके हे?
झोपलो मी जागले का हुंदके हे?

आसवांना या ढळाया वाट नाही
पापण्यांनी व्यापले का हुंदके हे

का जरासा तुजसमोरी हासलो मी
मीच माझे दाबले का हुंदके हे?

जाळुनी गेल्या सरी मज पावसाळी
श्रावणी या तापले का हुंदके हे?

हासणे मी मागता तुजला जरासे
सांग ना तू लाभले का हुंदके हे?

--शब्द्सखा!

वावटळ

श्रावणी कोठून आली ही वावटळ
वाळवंटी स्वैर झाली ही वावटळ

का फ़ुलांनी सजविले खोटेच मजला
भावली मज आज आली ही वावटळ

वादळाने बांधली कधिची सोयरी
वीज बनुनी आज व्याली ही वावटळ

आजही होते इरादे साधेच रे
सांडली का आज प्याली ही वावटळ

नेहमी तू भग्न, आता का रंगली
रंग माझे आज ल्याली ही वावटळ

'दीप' विझला, थांबला झंझावात ही
आज का झाली 'रुदाली' ही वावटळ

--शब्दसखा!

चांदरात

फ़ूलही कसे सलते उरात आहे?
वादळे कशी या अंतरात आहे?

वाट संपता माझा प्रवास होतो
पावले कशी वेड्या भरात आहे?

चुकवुनी रस्ते निघुन मरण गेले
वेदना अशा माझ्या घरात आहे

सोसतो असा आजकाल मज मी
आसवे बरी साध्या दरात आहे

वाळवंट रे हे बाग का खुलावी?
मेघ त्या कितीसे अंबरात आहे?

चांदणे ढळाले एकटा पुन्हा मी
काजळी कशी ही चांदरात आहे?


--शब्द्सखा!

या आसवांस माझ्या

या आसवांस माझ्या... तू साहतेस का गं?
अन आठवांत माझ्या... तू राहतेस का गं?

हरवून सूर गेले...मज सांजवेळ येता
या मैफ़लीत माझ्या... तू नाहतेस का गं?

होतेस का पुजारी... अन फूल ही कधी तू
तुज मंदिरात माझ्या... तू वाहतेस का गं?

आता उरात झरती... या वेदना सदाच्या
या वेदनेस माझ्या... तू चाहतेस का गं?

तू दूर दूर जाता... बघ निखळले सहारे
पडक्या घरास माझ्या... तू पाहतेस का गं?

--शब्द्सखा!

उठाव

स्वप्नात कोणता मी, शोधीत गाव आहे?
सत्यात हारलो मी, हर एक डाव आहे

पाहून येथ गेला, जो तो मला असा की
बेनाम जिंदगीचे, बदनाम नाव आहे

'होऊ नको दिवाणी', सांगू कसे तुला मी?
येथे खर्‍याखर्‍यांचा, मोडीत भाव आहे

मी गायलेच नाही, या मैफलीत गाणे
खोटेच सूर सारे, खोटा जमाव आहे

का शोक श्रावणाचा, खोटा घरात माझ्या?
सांगा कुणी तयाला, मजला सराव आहे

आता पसंत ना मज, स्वर्गात राहणेही
ध्रुवापरी अटळ मी, शोधीत ठाव आहे

ना दाद मागतो मी, ना वाहवा हवी मज
शब्दात आज माझ्या, दिसतो उठाव आहे

--शब्द्सखा!

वरात

कुठलेच दु:ख आता माझ्या घरात नाही
काहीच आज 'तसले' उरले उरात नाही

माळून चांदण्यांना तू दूर दूर गेली
हरवून चांद गेला तो अंबरात नाही

वाटा कधीच सार्‍या इथल्या गळून गेल्या
पाऊल थांबलेले आता भरात नाही?

मागू नको मला तू आता उधार काही
झालो फ़कीर तुजविण तू अंतरात नाही

मी जिंकलेच असते इवल्या दिशांस दाही
का ओढ या फ़ुलाची त्या भ्रमरात नाही?

घे तू..रडून घे तू मी थांबणार नाही
अद्याप पाहिली तू असली वरात

--शब्द्सखा!

इतुकेच आज झाले

इतुकेच आज झाले सारे कळून आले
का दु:ख अंतरीचे हे भळभळून आले

झाले नको नकोसे होते पुन्हा पुन्हा जे
ते स्वप्न का अताशा मागे वळून आले?

होऊन वागलो मी माळी तुझ्या महाली
केसूंत फ़ूल तुझिया ते दरवळून आले

माझ्यात दंगलेलो झिंगून लास होतो
झाली पहाट ना अन तारे ढळून आले

मी जिंकलो जरीही उरलो किती कितीसा?
माझेच श्वास जेव्हा मजला छळून आले

ही वाहवा निघाली आता नको तयांची
सांगू कसे कुणाला मज हळहळून आले

--शब्द्सखा...१५.१०.०८

माझिया वेदनांना कळाया लागलो मी

माझिया वेदनांना कळाया लागलो मी
होउनी रात आता ढळाया लागलो मी

सावल्या दाटल्या का अशा या पेटताना
राहुनी मौन आता जळाया लागलो मी

बोलुनी श्वास गेले ’पुरे हे खेळ आता’
माझियापासुनी अन पळाया लागलो मी

जाहले ओस सारे पुन्हा मी कोरडा रे
माझिया आसवांना छळाया लागलो मी

--शब्द्सखा!